Sunday, 15 April 2018

‘Climbing to the top demands strength, whether it is to the top of Mount Everest or to the top of your career.’
ए- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
            एमपीएससी व यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत इतिहास या घटकांत प्राचीन भारतातील इतिहासात गुप्त साम्राज्य हा महत्त्वाचा उपघटक आहे, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
 गुप्त साम्राज्य- मौर्याच्या साम्राज्याच्या अस्तानंतर सुमारे चारशे वर्षांचा कालखंड शक, कुशाणादी आक्रमकांच्या स्वाऱ्यांचा व त्यांच्या राज्यस्थापनांचा कालखंड होय. मौर्यानंतर उत्तरेत कुशाणांनी, तर दक्षिणेत सातवाहनांनी आपली राज्ये स्थापन केलेली दिसतात. या दोन्ही सत्तांनी आपापल्या राजसत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचाही अस्त लवकरच इ.स.च्या तिसऱ्या शतकाच्या मध्यावर घडून आला. उत्तरेत कुशाणांची सत्ता नष्ट होऊन अनेक नागराज्ये उदयास आली, तर दक्षिणेत सातवाहन सत्ता अस्तास जाऊन तेथे वाकाटकांची सत्ता प्रस्थापित झाली, पण याच काळात आणि वाकाटकांशिवाय भारतात अनेक छोटी-मोठी राज्ये अस्तित्वात आली होती. अशाच एका छोटय़ा राज्यापकी उत्तरेतील गंगेच्या खोऱ्यातील मगधाच्या प्रदेशात गुप्तांचे राज्य इ.स.च्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी उदयास आले. पुढे या राज्यास एकापेक्षा एक पराक्रमी राजा लाभल्यामुळे याकालखंडास इतिहासकारांनी ‘भारताच्या इतिहासातील सुवर्णयुग’ असे संबोधले. इ. स. २७५ च्या सुमारास गुप्त घराणे उत्तर भारतात सत्तेवर आलेले होते. श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक मानला जातो व चिनी प्रवासी इित्सग याच्या वर्णनावरून श्रीगुप्त याच्याविषयी माहिती प्राप्त होते.
सम्राट पहिला चंद्रगुप्त (इ.स. ३१९ ते इ.स. ३३४) 
        गुप्त घराणे हे वैश्य वर्णाचे असावे, असे इतिहासकारांचे मत आहे; तथापि चंद्रगुप्ताने क्षत्रिय वर्णाच्या लिच्छवी राजघराण्यातील कुमारदेवी या राजकन्येशी विवाह केला होता. या विवाहसंबंधामुळे चंद्रगुप्ताला वैशालीचे राज्य आणि लिच्छवी जमातीचे साहाय्य मिळाले आणि त्या जोरावर त्याने आपल्या राज्याच्या चतु:सीमा वाढवून आपले राज्य साम्राज्याच्या मार्गावर आणले. इ.स. ३२० मध्ये २६ फेबुवारी रोजी चंद्रगुप्ताचा राज्यारोहण समारंभ झाला. त्या निमित्ताने त्याने आपल्या घराण्याचा शक- गुप्तसंवत या नावाने सुरू केला. त्याचबरोबर त्याने महाराजाधिराज हे बिरूदही धारण केले. चंद्रगुप्ताच्या कारकिर्दीत गुप्त राज्य संपूर्ण बिहारवर व साकेतपर्यंतच्या उत्तर प्रदेश येथे विस्तारलेले होते.
समुद्रगुप्त (इ.स. ३३५-३८०)
चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त हा त्याचा पुत्र त्याच्या गादीवर बसला. हा पित्यासारखाच पराक्रमी होता. त्याच्या दरबारातील कवी हरिषेण याने त्याच्या स्तुतीपर पराक्रमाची गाथा गायली आहे. ही स्तुती अलाहाबादेच्या अशोक-स्तंभाखाली कोरलेली आहे. त्यात म्हटले आहे की, समुद्रगुप्ताने प्रथम आपल्या राज्याशेजारची अनेक राज्ये जिंकून मोठय़ा प्रमाणात साम्राज्यविस्तार घडवून आणला आहे. त्याने राज्याचा विस्तार उत्तरेत हिमालयापासून ते दक्षिणेत नर्मदा नदीपर्यंत, तर पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा नदीपासून पश्चिमेला यमुना नदीपर्यंत केलेला होता. याला भारताचा नेपोलियन म्हटले जाते. हा इतिहासात सनिकी पेशात एक कुशल योद्धा म्हणून ओळखला जातो. याने दक्षिणेकडील राजांना पराभूत केले, पण वाकाटका यांच्यासोबत संघर्ष केला नाही. 
समुद्रगुप्त हा कला आणि साहित्याचा थोर आश्रयदाता होता. समुद्रगुप्त हा विद्वान आणि कवी म्हणूनही प्रसिद्ध होता. याची कवीराज म्हणून स्तुती करण्यात येत असे. 
दुसरा चंद्रगुप्त ऊर्फ विक्रमादित्य (इ.स. ३८०-४१४)
समुद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र दुसरा चंद्रगुप्त हा गुप्त सम्राट बनला. त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना म्हणजे त्याची शकांवरील स्वारी. माळवा, गुजराथ, सौराष्ट्र (उत्तर भारताच्या इतिहासात चंद्रगुप्ताचे या शकांवरील विजयाचे महत्त्व मोठे आहे. शक हे परकीय राज्यकत्रे होते. त्यांचा शेवटचा अवशेष रूद्रसिंहाच्या राज्याच्या रूपाने शिल्लक होता. चंद्रगुप्ताने हे राज्य खालसा करून भारतीय भूमीवरील गेली ३०० वष्रे अस्तित्वात असलेला शकांचा अंमल कायमचा समाप्त केला. त्यामुळे त्यास इतिहासात शकारी अशा पदवीने गौरवलेले आहे. शकांवरील या विजयानंतर त्याने विक्रमादित्य हे बिरुद धारण केले असावे, असे इतिहासकारांचे मत आहे.
चंद्रगुप्त हा मोठा धोरणी राजा होता. शक व कुशाण या परकीय सत्तांचे पारिपत्य करण्यापूर्वी आपल्या दक्षिणेकडील नाग व वाकाटक या दोन राजसत्तांशी वैवाहिक संबंध जोडून त्याने आपल्या राज्याची पिछाडी सुरक्षित केली होती. मध्य प्रदेशातील कुबेरनागा या राज्यकन्येशी त्याने विवाह केला होता; तसेच आपली कन्या प्रभावती गुप्ता ही रूद्रसेन (दुसरा) या वाकाटक राजास देऊन त्याच्याशी मत्रीचे संबंध जोडले.
याच राजाच्या कारकिर्दीत फाहियान या चिनी (इ.स. ३९९-४१४) प्रवाशाने भारताला भेट दिलेली होती. याने गुप्त साम्राज्यातील शांतता व सुबत्ता यांची स्तुती केलेली आढळते. चंद्रगुप्ताच्या काळात भारतामधील व्यापार व उद्योगधंदे भरभराटीस येऊन भारतवर्ष देश खरोखरीच एक सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध पावला. चंद्रगुप्ताच्या आश्रयामुळे अनेक विद्या व कला यांचा विकास झाला.
दुसऱ्या चंद्रगुप्तानंतरचे गुप्त सम्राट- दुसऱ्या चंद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र कुमारगुप्त हा गुप्त सम्राट झाला. (इ.स. ४१५-४५५) हा काíतकेयाचा भक्त होता. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी पुष्यमित्र नावाच्या लोकांनी गुप्त साम्राज्यावर हल्ला केला. तो हल्ला राजपुत्र स्कंदगुप्त याने मोडून काढून गुप्त साम्राज्य सुरक्षित राखले. पुढे स्कंदगुप्त (इ.स. ४५५-४६७) सम्राट झाल्यानंतर त्याला आणखी एका मोठय़ा आक्रमणास तोंड द्यावे लागले. हे आक्रमण हुण नावाच्या रानटी लोकांचे होते. चीनच्या सरहद्दीवर हुणांच्या रानटी टोळ्या या काळात युरोप आणि इराण- भारत या प्रदेशांत घुसल्या होत्या. युरोपातील रोमनांचे साम्राज्य या हुणांनीच नष्ट केले. अशा या विध्वंसक व अतिशय क्रूर हुणांचा स्कंदगुप्ताने पराभव करून त्यांना परतवून लावले. या विजयाने स्कंदगुप्ताने केवळ गुप्त साम्राज्याचे नव्हे तर वैभवशाली भारतीय संस्कृतीचे रक्षण केले. म्हणून त्याला ‘भारतीय संस्कृतीचा त्राता’ असे म्हटले गेले. पुढे ५० वष्रे तरी हुण भारताकडे फिरकले नाहीत. पण स्कंदगुप्तानंतर गुप्त राजवंशात कर्तबगार राजे निर्माण झाले नाहीत. हळूहळू गुप्त साम्राज्यास उतरती कळा लागली.
गुप्तकालीन प्रशासन व्यवस्था
* देशात शांतता व सुबत्ता निर्माण करणारी राजसत्ता परमेश्वरस्वरूप (विष्णुरूप) मानली जाऊ लागली होती, म्हणूनच गुप्त सम्राटांनी स्वत:ला महाराजाधिराज, परमेश्वर, परमभट्टारक अशी बिरुदे लावल्याचे दिसून येते. समुद्रगुप्ताच्या एका स्तुतीमध्ये राजाचे वर्णन ‘लोककल्याणाकरिता पृथ्वीवर अवतीर्ण झालेला देव’ असे केलेले आढळून येते. अशा प्रकारे वंशपरंपरागत असलेल्या राजेशाहीला या काळात दैवी अधिष्ठान प्राप्त झाले होते.
* धर्मशास्त्राप्रमाणे राजाचा ज्येष्ठ पुत्र युवराज होत असे; पण गुप्त घराण्यात नेहमी हा दंडक पाळला गेला, असे नाही. कोणाही कर्तबगार व पराक्रमी पुत्रास साम्राज्याचा युवराज म्हणून नेमल्याची काही उदाहरणे आढळतात. राज्य कारभारात युवराजपद हे सम्राटाच्या खालोखाल महत्त्वाचे मानले जात होते.
* मौर्यकालाप्रमाणे गुप्तकालातही सम्राटास राज्य कोरभारात साहाय्य करण्यासाठी एक मंत्री परिषद होती.
* प्रत्यक्ष सम्राटाच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशांचे अनेक विभाग (प्रांत) पाडले होते. त्यांना भुक्ती असे म्हणत. त्यावर उपारिक नावाचा अधिकारी नेमला जाई.
* नगरांचे प्रशासन पाहणारी अनेक मंडळे असत. त्यांना अधिष्ठानाधिकरण असे म्हणत.
* प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांना रोख वेतन दिले जात असे. पण काही अधिकाऱ्यांना जमिनी इनाम (सरंजाम) दिल्याचेही 
दाखले मिळतात.
* गुप्त साम्राज्यात अनेक मांडलिक राज्ये होती. त्यांचा दर्जा निरनिराळ्या प्रकारचा असून त्यांना कमी-जास्त स्वायत्तता बहाल केली गेली होती.

No comments:

Post a Comment

‘Climbing to the top demands strength, whether it is to the top of Mount Everest or to the top of your career.’ ए- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम...